पिंपरी: आयटीनगरी हिंजवडी गेले काही दिवसांपासून वाहतूक कोंडी आणि पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे चर्चेत आहे. येथील कोंडी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नही सुरु आहेत; मात्र कोंडीचे चित्र जैसे थे आहे.
यातून आयटीयन्स तसेच स्थानिकांची सुटका करण्यासाठी मेट्रोकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे माण डेपो ते बाणेर स्टेशन दरम्यान मेट्रो धावण्यासाठी पीएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. आयटीयन्सकडूनही सातत्याने मागणी होत आहे. मागणीची दखल घेतल्यास पुढील दोन महिन्यांत मेट्रो रूळावरून धावू शकेल.
हिंजवडीतील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि त्याच बरोबर वाहतूक पोलिसदेखील विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, वाहतूक कोंडीतून आयटीन्सची सुटका झालेली नाही. त्यातच पावसाच्या काळात रस्त्यावर मोटारींची संख्यादेखील वाढली आहे.
दरम्यान, ही वाहतूककोंडी कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळविण्यासठी मेट्रो सक्षम पर्याय आहे. त्याच धर्तीवर आता माण डेपोपासून पुढे पहिली दहा स्टेशन्स सुरू करता येतील का, याबाबतचे नियोजन मेट्रोकडून केले जात आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी, माण या मेट्रो स्थानकाचे काम 87 टक्के झाले आहे. मेट्रोचा ट्रकचे कामही पूर्ण झाले आहे. आता केवळ स्टेशनची कामे काही प्रमाणात अपूर्ण राहिलेली आहेत. मेट्रोचे चार अत्याधुनिक रेक डेपोमध्ये दाखल झाले आहेत. तसेच, त्याचीदेखील चाचणी घेण्यात आली आहे.त्यानंतर चार दिवसांपूर्वी माण डेपो ते पीएमआर या चार स्थानकांवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. आणखी पुढे सहा स्थानकापर्यंत चाचणी पूर्ण झाल्यावर तसेच स्थानकांची उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो धावण्याची शक्यता आहे.




