- भ्रष्टाचाराच्या एकाही मुद्यावर उत्तर न देता महेश लांडगे यांना फडणवीस यांचा सबुरीचा सल्ला
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोपांना भाजपकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. बुधवार रोजी आकुर्डी विठ्ठल मंदिर मैदानावर झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास अर्धा तास भाषण केले. मात्र, अजित पवार यांनी उभे केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या मुद्द्यांवर एकाही ओळीचा खुलासा न करता ते टाळले. उलट, सतत आक्रमक टीका करणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना “फक्त टीका न करता विकासकामे सांगा, सबुरी ठेवा” असा सल्ला देत त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
याच्या अगोदर अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत दोन मोठे दौरे, सहा सभा आणि दोन पत्रकार परिषदांमधून भाजपवर गंभीर आरोपांचा धडाका लावला आहे. उद्याही पाच सभा आणि जाहीरनाम्याचे प्रकाशन अशा दमदार प्रचार नियोजनासह राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्व समाजघटक, उद्योजक, व्यापारी तसेच धार्मिक घटकांच्या बैठका घेऊन अजित पवार यांनी शहराचा सखोल संपर्क साधला. त्याच्या तुलनेत भाजपकडून केवळ एकच सभा व एक रॅली एवढ्यापुरता मर्यादित प्रचार दिसून येत आहे. आकुर्डी विठ्ठल मंदिर मैदानाची अवघी एक हजार लोकांची क्षमता असताना, अजित पवार यांच्या जंगी सभांना मिळणारा प्रतिसाद यावरून जनमताची दिशा स्पष्ट होत असल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांच्या एका सभेनंतरच शहरातील राजकीय हवा पालटल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी भाजपच्या कारभारावर थेट बोट ठेवत ७० लाखांचा पादचारी पूल ७ कोटींना जाणे, ८००० कोटींच्या ठेवी मोडणे, नऊ वर्षांत तब्बल ४०,००० कोटींचा खर्च होऊनही ठोस कामे न दिसणे, नद्यांचे वाढते प्रदूषण, डक्ट खोदाईत वाढलेला ‘खोदाई माफिया’, तसेच ६६० कोटी खर्च करून बसवलेले ९५५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ७० टक्के कॅमेरे बंद असल्याचे सवाल उपस्थित केले.
या मुद्द्यांवर उत्तर न देता केवळ खालच्या पातळीवरील टीका केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी महेश लांडगे यांना संयम राखण्याचा सल्ला देणे ही विकास विरुद्ध भ्रष्टाचार अशा मुद्यांवरची थेट लढत अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या काही दिवसांत अजित पवार यांच्या आक्रमक शैलीसमोर भाजप कशी रणनीती आखते आणि प्रभागनिहाय जनमत कसे वळते, आणि भाजप भ्रष्टाचारातून बरबटलेले कपडे कसे स्वच्छ धुवून घेते याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.




