पिंपरी, ०४ एप्रिल :- स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरभास्करास ”स्वर यज्ञ” या एक दिवसीय सांगीतिक महोत्सवातुन ” स्वर सुमनांजली” अर्पण करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून याचे उद्घाटन शनिवारी (दि. ९ एप्रिल) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ६ वाजता होणार आहे. यामध्ये सलग २४ तास स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप रविवारी (दि. १० एप्रिल) सकाळी ६ वाजता होणार आहे अशी माहिती संगीत महोत्सवाचे संयोजक अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर आणि कलाश्री संगीत मंडळाचे पं. सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सोमवारी (दि. ४ एप्रिल) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र आमले, सुहास जोशी, पं. सुधाकर चव्हाण, राजेंद्र बंग, गौरी लोंढे, सुषमा समर्थ आणि चारुशिला कणगतेकर आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा आणि पिंपरी चिंचवड शहराचा अनुबंध अनेक वर्षापासूनचा आहे. पंडितजींनी शहरांमध्ये अनेक संगीत मैफली रंगविल्या आहेत. यंदा स्वरभास्कराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने सांगितिक महायज्ञ करण्याची संधी नाट्यपरिषद आणि कलाश्री संस्थेला मिळत आहे. ही भाग्याची गोष्ट आहे अशा प्रकारचा सांगितिक सोहळा प्रथमच होत आहे. औद्योगिक नगरीला सांस्कृतिक नगरी आणि सांगीतिक नगरी करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव सुवर्णपान ठरेल.
प्रेक्षकांनी मोफत प्रवेश पाससाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह नाट्य परिषद कार्यालय सायं. ६ ते ८ (राजू बंग 9822313066.), कलाश्री संगीत मंडळ, मधुबन सोसायटी, सांगवी सकाळी ९ ते १२, सायं. ५ ते ८ (शाम देशमुख 8983379702), सुषमा सायन्स सेंटर, काळेवाडी फाटा, सायं. ४ ते ७ (9765395025) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.