मुंबई : मी आजच्या आपल्या महामंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा निमित्ताने सांगू इच्छितो की, जर कुठल्या साखर कारखान्यांनी १० रुपये प्रति टनप्रमाणे पैसे दिले नाही, तर पुढच्या वर्षी तिथं कोयता पडणार नाही, अशी भूमिका घ्या. मी मी म्हणणारे, अजित पवार पण गप बसून पैसे देईल. कोणी काही बडबड करणार नाही,” मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी अजित पवार बोलत होते. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आजी माजी आमदारही कार्यक्रमाला उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यानी टनांला १० रुपये दिले. तेवढेच १० रुपये राज्य सरकार देईल. मी आता एवढ्यात शेखर गायकवाड यांना विचारत होतो, की यंदा किती पैसे जमा होतील, तर अंदाजे ११० कोटी रुपये साखर कारखान्यांकडून जमा होतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अर्थमंत्री या नात्याने सांगतो की, महाविकास आघाडी सरकार मार्फत त्यामध्ये ११० कोटी जमा केले जातील. त्यामुळे साधारणपणे यंदाच्या वर्षी २२० कोटींचा फंड जमा होईल. तसेच बांधकाम कामगार महामंडळ खूप मोठं आहे. त्यामध्ये काही हजार कोटी रुपये जमा झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


