पिंपरी : माजी मंत्री आणि मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे सध्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिव़डणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. तर, इकडे मावळातील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कॉंग्रेसच्याही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज (ता.७ एप्रिल) राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातून मावळात राष्ट्रवादीतील इनकमिंग सुरुच राहिले आहे.
नाणे मावळ व पवन मावळातील भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद दिवसागणिक वाढत असून भाजपला खिंडार पाडण्यात ती यशस्वी होताना दिसते आहे. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या पुढाकाराने हे इनकमिंग झाले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, उमेश पाटील, आमदार शेळके, खांडगे तसेच मावळ तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.




