पिंपरी : नुकत्याच जाहीर झालेल्या रेडी रेकनरच्या दरावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर बुधवारी (ता. ७ एप्रिल) तोफ डागली होती. शहरात चिंचवडपेक्षा भोसरीत रेडी रेकनरचा दर कमी असल्याचे सांगत आमदार लांडगेंचे भोसरी व्हिजन-२०२० चे गाजर दिवाळखोरीत निघाले असल्याची जहरी टीका गव्हाणेंनी केली होती. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा आमदार लांडगे यांचे नाव न घेता भाजपवर शहराच्या मोशी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीवरून थेट हल्लाबोल केला.
मोशी कचरा डेपोला बुधवारी (ता. ६ एप्रिल) सायंकाळी लागलेली आग ही संशयास्पद आहे. कोट्यवधी रुपयांची कामे न करताच बिले उचलणाऱ्या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना आणि त्यातून भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेत्यांना वाचविण्यासाठी ती आग लावण्यात आल्याचा संशय गव्हाणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे चौकशी समिती नेमून या आगीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. अन्यथा पालिकेसमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मोशी कचरा डेपोत लागलेली मोठी आग अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. या आगीबाबत सर्वच स्तरावरून संशय व्यक्त होत आहे. मोशी कचरा डेपोचे व्यवस्थापन पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या जातात. त्यावर पालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. कचरा डपोतील ठेकेदारी पद्धतीने सुरू असलेली कामे ही भाजप आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहेत, असा दावा अजित गव्हाणे यांनी केला आहे.
- कोरोना काळातील भ्रष्ट्राचार लपवण्यासाठीच कचरा डेपोला आग….
काेरोना काळात कोणतीही कामे न करता काही ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, कॅपिंग, औषध फवारणीसारखी करोडो रुपयांची कामे भाजपच्या कारभाऱ्याने आपल्या बगलबच्च्यांना देऊन त्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप गव्हाणे यांनी केला आहे. यातील एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. सत्तेच्या जोरावर मुदतवाढ देऊन ठेकेदार पोसण्याचे काम भाजप सत्ताधाऱ्यांनी केले. यापुढेही ही कामे लवकर होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे ठेकेदारांना वाचविण्यासाठी आणि त्याद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत मोशी कचरा डेपोच्या माध्यमातून लुटलेली कोट्यवधींची माया दडपण्याचा आग लावून भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.




