प्ले बॉय होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला सायबर भामट्यांनी 17 लाख 38 हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या तरुणाने भामट्यांना दिले होते.
दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दयाशंकर मिश्रा, रागिनी, विक्रम सिंग आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण हा उच्चशिक्षित आहे. परंतु काम मिळत नसल्यामुळे तो घरीच बसून होता. वर्षभरापूर्वी त्याला सोशल मीडियावर प्लेबॉय झाल्यास भरपूर कमाईची संधी अशी जाहिरात दिसली होती. या जाहिरातीला बळी पडून त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि त्याची फसवणूक होण्याला सुरुवात झाली.



