पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – मुर्दाबाद मुर्दाबाद सदावर्ते मुर्दाबाद, अनिल बोंडे हाय हाय, भाजप मुर्दाबाद अशा घोषणा देत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी घुसून हल्ला केला. यावेळी आंदोलकांनी दगड व चपलफेक केली. त्याचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर योगेश बहल, युवक अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते, आजी – माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गुरूवारी न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र आज काही कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराच्या आवारात घूसून दगडफेक केली. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
जित गव्हाणे म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. राजकीय मतभेद आणि धोरणातील मतभिन्नता वेगळी, मात्र या घटनेला आंदोलनाचा मुलामा देऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तो मान्य करणे क्रमप्राप्त होते. मात्र त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? निकाल लागल्यानंतर त्या निर्णयाचे स्वागत केले होते मात्र आज परत अशा विखारी कृत्यामागचा हेतू काय आहे. या आंदोलनामध्ये पवार यांच्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक करणाऱ्यांचा बोलवता धनी कोणी वेगळा आहे. पोलिस प्रशासनाने आजच्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गव्हाणे यांनी यावेळी केली.


