पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुदत संपुष्टात येण्यापूर्वी भाजपकडून करण्यात आले. मात्र संपूर्ण कामकाज पूर्ण न करता उद्घाटन झाल्याचे दिसून येत आहे. मोठा गाजा वाजा करून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी दि. १३ मार्च २०२२ अनावरण करण्यात आले. मात्र पुन्हा काम करण्यासाठी पुतळ्याला झाकण्यात आले आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी ऐतिहासिक कामगिरी आहे असे दरेकर यांनी म्हटले आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडली आहे. महाराजांचा पुतळा नागरिकांना प्रेरणा देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा मी आभारी आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. मात्र काही दिवसात पुतळा परिसरात काम अपूर्ण असल्याने पुन्हा पुतळ्याला झकण्यात आले आहे.
पंचधातूमधील हा अश्वारुढ पुतळा आहे. पुतळ्याची जिरेटोपपर्यंतची उंची २१ फूट आहे. तलवारीच्या टोकापर्यंतची उंची २८ फूट इतकी आहे. या पुतळ्याचे वजन ६ टन असून फक्त घोड्याच्या मागील दोन पायावर उभा असणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस उंच दगडी बांधकाम असणारी कमानभिंत आहे. या कामासाठी २ कोटी २० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे.



