निगडी : ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत चल,’ असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पीटल दरम्यान सार्वजनिक रोडवर निगडी येथे गुरूवारी (दि.07) ही घटना घडली.
याबाबत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आदित्य आनंदा बोत्रे (येलवाडी, खेड) या इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मैत्रिणी सोबत रस्त्याने जात होत्या. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आला व मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे फिर्यादी यांना म्हणाला. फिर्यादी महिलेने नकार दिला तर आरोपीने महिलेचा हात धरून, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत चल,’ असे म्हणून विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.




