कार्ला : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेसाठी आलेल्या एका भाविकांचा खून झाल्याची घटना आज (दि. 9) रात्री १ वाजण्याच्या सुमारास वेहेरगावच्या तळ्याजवळ घडली आहे.
मनोज कुंडलिक पाटील (वय 49, रा. कोपरी ठाणे) असे या मयत भाविकाचे नाव असून हर्षल चंद्रकांत पाटील (रा. कोपरी ठाणे) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राहूल भास्कर पाटील यांनी चार अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीवरून दिलेल्या माहितीनुसार वेहेरगाव पायथा मंदिरासमोरली रस्त्यावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत व जखमी यांच्या ग्रुपमधील कार्तिक प्रकाश म्हात्रे यांचा मोबाईल चोरीला गेला. यावेळी शेजारी असलेल्या सदर अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल तुम्ही घेतला का अशी विचारणा केल्याच्या कारणावरून ही भांडणे झाली. यामध्ये अनोळखी व्यक्तीमधील एकाने तिक्ष्ण हत्याराने मनोज पाटील यांच्या छातीवर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सदरचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर या घटनेचा तपास करत आहेत.



