
बीआरटी मधून सर्रास खाजगी वाहने चालवली जातात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येतो. वाहतुकीची शिस्त बिघडते तसेच रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांचा धोका वाढतो, यासाठी रावेत येथील नागरिकांनी रस्त्यावर येत बीआरटी मधून धावणाऱ्या खाजगी वाहनांना विरोध केला.
प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय, प्रज्ञा साळुंखे, मोनल महादेवीया, नझला मल्लाही, अर्चना भोसले, अश्विनी सरदेसाई, मिथिला आवारे, पूनम सिंग, अदिती सिन्हा, नम्रता श्रीवास्तव, पार्थ राँय, रविंद्र खैरे आदींनी ही चळवळ सुरु केली आहे.
सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, नागरिकांना चांगली सेवा मिळण्याच्या उद्देशाने बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. बीआरटी मधून पीएमपीएमएलच्या बस धावतात. मात्र अनेक वेळेला खाजगी वाहनांच्या अडथळ्यामुळे बीआरटी बस अडकून पडतात. शिवाय रस्ता ओलांडणा-या नागरिकांना बीआरटी रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
रावेत येथील सेलेस्टियल सिटी येथील बीआरटी ओपनिंगला अनेकदा अपघात होत आहेत. पीएमपीएमएलला अनेकदा नागरिकांनी कळवूनही जागोजागी नेमलेले अटेंडन्ट जागेवर नसतात. 1 ते 11 एप्रिलपर्यंत या बीआरटी रोडवर एकही अटेंडन्ट कामावर रुजू नव्हता, असे सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रावार यांनी सांगितले.



