वडगाव मावळ : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावल पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बुधवारी (दि.२०) वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या तक्रार निवारण दिनामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 103 तक्रारींचे निवारण तर लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील 70 तक्रारींचे निवारण करण्यात आले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने कृष्णाई रिसॉर्ट या ठिकाणी तक्रार निवारण दिन भरविण्यात आला होता. या ठिकाणी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह सर्व बीट चे प्रमुख व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. मितेश घट्टे यांच्यासह राजेंद्र पाटील प्रवीण मोरे यांनी तक्रारदारांचे व गैरतक्रारदार यांचे म्हणणे एकून घेत ते प्रश्न सामंजस्याने सोडविले. ज्या तक्रारींचे निराकरण झाले नाही. अथवा गुन्हा दाखल करण्याजोगे विषय होते, त्याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देखील वरिष्ठ अधिकारी व शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदारांच्या अर्जांचे निराकरण केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या, त्यामध्ये सामंजस्य घडवून आणत चर्चेमधून विषय मार्गी लावले. नागरिकांनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासून दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदार व गैरतक्रारदार तक्रार निवारण दिनाच्या ठिकाणी उपस्थित होते.



