बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रविवार दि.१७ एप्रिल रोजी प्रसिध्द पर्यटन स्थळ दिवेआगर येथील ग्रामपंचायत कार्यालयामधे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकास कामे व पर्यटन व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटकांची संख्या जास्त असते.सुवर्ण गणेशाच्या पुनःस्थापनेनंतर पर्यटकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे त्यामुळे देवस्थानच्या दानपेटीलाही आर्थिक बळ मिळाले आहे. दिवेआगर येथे येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.नोव्हेंबर पासून आजपर्यंत सूमारे साडेआठ कोटी निधी महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला असून त्यातील पाच कोटी निधी कासव संवर्धन केंद्रासाठी वापरण्यात येणार आहे. महाबळेश्वरच्या धर्तीवर दिवेआगर येथे भौगोलिक मानांकन प्राप्त येथील रोठा सुपारी व इतर प्रसिद्ध वस्तूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करुन स्थानिकांना व महीला बचत गटांना रोजगारासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येईल.समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही गोष्टी पर्यटकांना पाहता येतील यासाठी विविध स्थानांचा प्राचीन धर्तीवर विकास करण्याचा मानस आहे.
येथील प्रसिध्द सिध्दनाथ व केदारनाथ मंदीरांचा प्राचीन धर्तीवर विकास करण्यात येईल. दिवेआगार येथे येणारा पर्यटक हा दोन ते तीन दिवसासाठी इथे थांबला तर त्याचा फायदा हा स्थानिक व्यावसायिकांनाच होईल.त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयासाठी एक चांगला आराखडा तयार करून त्या जागेवर एक ग्रामपंचायत कार्यालयाबरोबरच बहुउद्देशीय इमारत व त्यामध्ये पर्यटन पुरक व्यवसायासाठी स्थानिकांना गाळे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.अशी इमारत उभी राहिली तर एक हक्काचं व्यासपीठ गावातील व्यावसायिकांना मिळेल त्यासाठी लवकारात लवकर प्रयत्न करण्यात येतील श्रीवर्धन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही त्याचबरोबर दिवेआगरला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी सरपंच उदय बापट,ग्राम पं.सदस्य,माजी सरपंच व विद्यमान ग्राम पं.सदस्य प्रकाश दातार माजी सभापती लालाभाई जोशी व सुकूमार तोंडलेकर,श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे,ग्रामसेवक शंकर मयेकर,सुचिन किर व पत्रकार उपस्थित होते.



