आळंदी : चऱ्होली खुर्द (ता.खेड) येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज उत्सव रविवार ते मंगळवार (दि.२४,२५,२६) या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.चऱ्होली खुर्द येथे रोकडोबा महाराज उत्सवाच्या निमित्ताने रविवार दिनांक २४ दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती कार्यक्रम,सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक व हारतुरे सुरू होणार असून सकाळी नऊ वाजल्यापासून सुसज्ज अश्या बैलगाडा घाटात बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार आहेत.रात्री आठ वाजता श्रींच्या पालखीचा कार्यक्रम होऊन रात्री दहा वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.२५ रोजी दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाड्याचा कार्यक्रम होणार आहे.रात्री दहा वाजता बेधुंद अप्सरा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दि.२६ रोजी उर्वरित बैलगाडा शर्यती होणार आहे असे यात्रा कमिटीचे निखिल थोरवे,रामदास घोलप आणि सुभाष थोरवे (बारामतीकर) यांनी सांगितले आहे.
रविवार दि.२४ रोजी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून एकूण ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस विभागून दिले जाणार आहे. प्रथम क्रमांकास १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ९१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ७१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ५१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकास २५ हजार रुपये विभागून दिले जाणार आहे. प्रत्येक क्रमांकामध्ये फळी फोड गाड्या बक्षीस दिले जाणार आहे यामध्ये चार टू व्हीलर तसेच अन्य वस्तु व रोख बक्षीसही दिले जाणार आहे. घाटाचा राजा आकर्षक बैलगाडा तसेच वीस फुटावरून कांडे जोडणारा बैलगाडा यांनाही आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.
चऱ्होली खुर्द ग्रामस्थ यांनी लोकवर्गणीतून खर्च करून भव्य बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या काम पूर्ण केले आहे.बैलगाडा घाटाला संपूर्ण संरक्षक भिंत बसवण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे असे घाटात बैलगाडा घाटात चे संपूर्ण नियोजन चऱ्होली खुर्द ग्रामस्थ व बैलगाडा मालक यांनी केले आहे.




