तळेगाव दाभाडे – जमीन व्यवहाराच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी आपल्याकडे असल्याचे खोटे सांगून जमीन विक्रीच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली आहे. 22 फेब्रुवारी 2021 ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत तळेगाव स्टेशन येथे ही घटना घडली.
याप्रकरणी रुपाली दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विश्वजित उर्फ भाऊ कामठे, छाया दत्तात्रय बोत्रे, अमोल दत्तात्रय बोत्रे, मयुरी दत्तात्रय बोत्रे (लग्नानंतरचे नाव मयुरी मोहोळ) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. रुपाली दाभाडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्य तसेच रायगड जिल्हा निरिक्षक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी नावाच्या व्यक्तीच्या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी आरोपी यांच्याकडे असल्याचे भासवून 00.85 आर जमीन फिर्यादी रुपाली दाभाडे यांना विकण्याचा आरोपींनी बनाव केला. त्यापोटी दाभाडे यांच्याकडून 60 लाख रुपये घेतले. आरोपी विश्वजित आणि छाया यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ही बाब त्यांनी दाभाडे यांच्यापासून लपवून ठेवली. आरोपींनी फिर्यादी दाभाडे यांना आरोपी छाया हिला पैसे देण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, तळेगाव पोलिसांनी आरोपी छाया दत्तात्रय बोत्रे या महिला आरोपीला अटक केली असून, पोलीस निरीक्षक इंगळे अधिक तपास करीत आहेत.



