लोणावळा : शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील खंडाळा भागात एच.पी.सी.एल. एम.ओ.व्ही.3 मर्मस्थळ पॉईंट अर्थात पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या पाईपलाईन शेजारी अचानक आग भडकल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली. अचानक लागलेली ही आग एखाद्या घातपाताचा भाग असू शकतो या शक्यतेने मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसदलाने आणि अग्निशमन दलाने महत्प्रयासाने आग लागल्यापासून पुढील दोन तासात सदर आग आटोक्यात आणून विझविली आणि सर्वांनीच निःश्वास सोडला.


शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एक फोन खणखणला की लोणावळ्यातील खंडाळा भागात एच.पी.सी.एल. मर्मस्थळ पॉईंट अर्थात पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या पाईपलाईन शेजारी अचानक आग भडकली आहे. यावर अलर्ट झालेल्या लोणावळा पोलिसांनी तात्काळ ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीच्या पोलीस बाळाची मागणी केली. तात्काळ नियंत्रण कक्षाकडून लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव या तीनही पोलीस ठाण्यात सूचना दिल्या गेल्या.
लोणावळा उपविभागातील अधिकारी व अमलदार, लोणावळा नगर परिषदेचे व एच.पी.सी.एल. कंपनीचे अग्निशमन वाहन, अँम्बुलन्स असा मोठा ताफा सायरन वाजवत घटनास्थळाकडे रवाना झाला. एकीकडे हे सर्व बघणाऱ्या नागरिकांच्या मनात पाल चुकचुकली की कुठं काही घडलं तर नाही ना. त्यामुळे सर्वांच्या मनात भीती सोबत एक कुतूहल देखील निर्माण झालं की नक्की घडलंय काय. दुसरीकडे लोणावळा पोलीस स्टेशनचे पो. नि. सिताराम डुबल, स.पो.नि. बावकर, पो.उप.नि. मुजावर व 27 पोलीस अमलदार, होमगार्ड, वार्डन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रविण मोरे व 10 पोलीस अमलदार, कामशेत पोलीस स्टेशनचे पो. नि. जगताप व 5 पोलीस अमलदार, वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे स.पो.नि. जाधव व 3 पोलीस अमलदार असे सर्व एकुन 6 पोलीस अधिकारी व 50 पोलीस अमलदार, होमगार्ड, वार्डन, एच.पी.सी.एल. कंपनीचे सिक्युरिटी अधिकारी विवेक दिनकर, तसेच लोणावळा नगर परिषदेचे अग्निशमन वाहन व स्टाफ , एच.पी.सी.एल. कंपनीचे अग्निशमन वाहन व स्टाफ, अँम्बुलन्स व स्टाफ सर्व साहित्यासह हजर झाला. सर्वांनी एकत्रित प्रयत्नाने पुढील काही वेळातच आग आटोक्यात आणून विझवली. साधारण सकळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान हा सर्व घटनाक्रम घडला.
तोपर्यंत या सर्व घटनेबाबत उत्कंठा दाटलेल्या आणि तर्कवितर्कात अडकलेल्या नागरीकांपर्यंत बातमी पोचली हा सर्व एका मॉक ड्रिलचा भाग होता. हे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र या सर्व घटनाक्रमातून कसल्याही आपत्ती काळात, कोणत्याही बिकट परिस्थितीला तोंड देण्यास पोलिसदल सज्ज असल्याचे या मॉक ड्रिलमधून दाखवून देण्यात आले.


