वडगाव मावळ :- शासकीय आदेशानुसार मावळ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सध्या शाळा पूर्वतयारी हा उपक्रम जोरात सुरु आहे. कोरोनामुळे या वर्षी शाळा उशिरा सुरु झाल्या. पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्याचा शासकीय आदेश असल्याने मावळातील सर्व शाळा एप्रिलचा पंधरवडा उलटून गेला तरीही गजबजलेल्या दिसत आहेत.
शाळा पूर्वतयारी उपक्रमाद्वारे नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत केले जात आहे. मराठी शाळांचे महत्त्व समजावून सांगत जिल्हा परिषदेच्या शाळेतच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहनही केले जात आहे.
शाळा पूर्वतयारी उपक्रम राबवताना काही शाळांमध्ये नवागतांचे बैलगाडीत बसून तर काही ठिकाणी ट्रँक्टरमध्ये स्वागत करण्यात आले. मुलांचे वजन व उंची तपासणे, लहान-मोठी वस्तू ओळखणे, मनोरंजनात्मक खेळ घेणे, चित्रवर्णन, कुटूंबाची माहिती सांगणे, वर्गीकरण करणे इ.उपक्रमांतून विद्यार्थ्यांची उत्तम रितीने पूर्वतयारी करुन घेतली जात आहे. हा उपक्रम राबवताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. ग्रामस्थ व गावातील पदाधिकारी स्वतः या उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहेत.अनेक ठिकाणी बैलगाडीचे सारथ्य शिक्षकांनी केल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.शाळाबाह्य मुलांची संख्या घटण्यासाठी व १००% पटनोंदणी होण्यासाठी हा उपक्रम साहाय्यभूत ठरत आहे.




