मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्त्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होत आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून येथील मराठीपण जपत मुंबईकरांच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टांचं फळ मिळालं पाहिजे या दृष्टीनं विकास केला जात आहे. मुंबईनं घोडागाडी ते मेट्रोपर्यंतचा प्रवास पाहिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांनीही या शहराच्या विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, अशा तरूणांनी लक्ष घातलं तर काय होऊ शकतं, हे मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईत रस्ते, मेट्रो, उड्डाण पुल अशी विविध विकास कामं, प्रकल्प सुरु आहेत. मुंबईच्या बेस्ट सेवेचा जागतिक स्तरावर उल्लेख केला जातो. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.
मुंबईत वरळी परिसरात जागतिक स्तरावरील पर्यटन प्रकल्प, मराठी भवन, जीएसटी भवन उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा येथे देशातील सर्वोत्तम असं वसतिगृह उभं करण्यात येईल. ज्यामध्ये सारथी, महाज्योती आणि राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.


