पिंपरी (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातील महापालिका निवडणुकांची तयारी पुन्हा सुरू केली असून अंतिम प्रभाग रचना येत्या 17 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. 11 मे पर्यंत उर्वरित कामकाज पूर्ण करून 12 मे रोजी राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यभरातील महापालिकांना दिले आहेत.
करोनामुळे राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कार्यकाळही 13 मार्च रोजी संपुष्टात आला आहे. वेळेत निवडणुका न झाल्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकांची मुदत संपुष्टात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2021 पासून प्रभागरचनेच्या कामाला सुरुवातही केली होती. प्रारुप आराखडा प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागविणे, प्राप्त सूचना व हरकतींची सुनावणी घेणे तसेच सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकार्यांच्या शिफारशीसह अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्याबाबतची प्रक्रिया 5 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे.
मात्र राज्य शासनाने प्रभागरचनेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा कायदा केल्यामुळे 11 मार्चपासून राज्य निवडणूक आयोगाचे कामकाज थांबले होते. 4 मे रोजी झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाला ‘ज्या ठिकाणी कामकाज थांबले होते, तेथून पुढे सुरू करा’ असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेच्या कामाला पुन्हा वेग दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने उपायुक्त अविनाश सणस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, कल्याण डोंबिली, मुंबई व ठाणे महापालिकांना प्रभाग रचना अंतिम करण्याबाबतचा आदेश बजाविला आहे. त्यानुसार या महापालिकांना 11 मे रोजी प्रभाग रचना अंतिम करावी लागणार असून त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी 12 मे रोजी निवडणूक आयोगाकडे पाठवावी लागणार आहे. या अंतिम रचनेवर निवडणूक आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर 17 मे रोजी प्रभागरचनेचा अंतिम आराखडा जाहीर राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज काढलेल्या आदेशामुळे महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले असून प्रभाग रचनेनंतर मतदारयाद्या अंतिम करणे व आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे निवडणुका तात्काळ घेण्याकडे निवडणूक आयोगाचाही कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- तीन सदस्यीय प्रभाग रचना
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी तीन सदस्यीय प्रारुप प्रभागरचना केली आहे. हीच प्रारुप प्रभागरचना हरकती आणि सूचना निरस्त करून अंतिम केली जाणार असल्यामुळे महापालिकेची निवडणूक ही तीन सदस्यीय पद्धतीने होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. तर निवडणुका तात्काळ झाल्यास ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होण्याची शक्यताही आता बळावली आहे.




