पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यात थेट मुख्यमंत्रीच लक्ष घालणार असल्याने अनेकांच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदार शरद पवार यांना पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विनंतीनुसार राज्य सरकारने यात लक्ष घातले आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्रीच या प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत नदीकाठ सुधार प्रकल्प हा प्रचाराचा केंद्रबिदू ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या आढावा बैठकीची माहिती दिली. ‘या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; पण महापालिकेने समाधानकारक उत्तरे दिलेली नाही. त्यातील त्रुटी दूर करूनच हा प्रकल्प झाला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे चव्हाण म्हणाल्या.
महापालिका प्रशासनाने सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी असा नदीकाठ सुधारणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा या दोन्ही नद्यांच्या काठांचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या दोन निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. मोदींच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पाचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्याच्या जलसंपदा विभागाने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकेच्या अनुषंगाने महापालिकेला सादरीकरण करण्याचे आदेश दिले होते. हे सादरीकरण झाले असून, महापालिकेकडून खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आढावा घेणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले.



