तळेगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या बोलण्याच्या हजरजबाबी शैलीमुळे आणि सडेतोड प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आपल्या भाषणांमधून देखील मिश्किल टिप्पणीद्वारे अजित पवार विरोधकांना चिमटे काढत असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्याच सुरू असलेल्या वादाच्या मुद्द्यांवर अजित पवारांनी तळेगावमध्ये बोलताना टोलेबाजी केली आहे. तळेगाव नगरपरिषद इमारतीचं आज अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं.
सुप्रिया सुळेंविषयी बोलताना चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन स्वयंपाक करा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून अजित पवारांनी टोला लगावला आहे. “जगात आमचा पक्ष मोठा आहे, असे भाजपावाले एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबद्दल पुण्यात अपशब्द वापरतात. आम्ही ग्रामीण भागातून आलो आहेत. आम्हालाही बरेच काही बोलता येते. ‘भ’ ची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल. पण आम्ही त्या स्तरावर जाणार नाही”, असे अजित पवार म्हणाले.




