पिंपरी, ९ जून :- महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांची मालमत्ता जप्तीची कारवाई जून महिन्यातच सुरू केली आहे. विभागाने मंगळवारी (दि. ७) चिखली व महात्मा फुलेनगर येथील हॉटेल व शॉपिंग मॉलला सील लावले.
चिखली कर संकलन विभागीय कार्यालयाने केलेल्या कारवाईत रोहिदास मोरे यांची मिळकत सील केली. त्यांच्याकडे १ कोटी ३२ लाख ६० हजार २२५ रुपयांचा मिळकतकर थकीत आहे. महात्मा फुलेनगर येथील संतोष फुले याची मिळकतही सील करण्यात आली. त्यांच्याकडे १४ लाख ४० हजार ८६० थकबाकी आहे. सहायक क्षेत्रीय आयुक्त नीलेश देशमुख, अधिकारी सीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी महेंद्र चौधरी, संजय लांडगे, महादेव चेरेकर, कालिदास शेळके, शंकर कानडी यांच्या पथकाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने कारवाई केली.
आज अखेर शहरातील एकूण १ हजार मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांवर मिळकत सीलची कारवाई वर्षभर सुरू राहणार आहे. थकबाकीदारांनी संपूर्ण बिल भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहायक आयुक्त देशमुख यांनी केले आहे.




