अवैधरित्या सावकारी केल्याबद्दल एका व्यक्तीला येरवडा पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलीसांनी दोन लाख १२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रमजान मोहंमद खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी- फिर्यादी याने रमजान खान याच्याकडून २०२१ मध्ये ५० हजार व डिसेंबरमध्ये एक लाख रुपये रोख असे मिळून दिड लाख रुपये कर्जाने घेतले होते. त्याबद्दल फिर्यादी शेख याला दहा टक्के व्याजाने पैसे परत देत होते. त्याच्या मोबदल्यात मुद्दल व व्याज मिळून एप्रिलपर्यंत फिर्यादी याने खान याला २ लाख १२ हजार २५० रुपये परत केले होते. मात्र खान याने एक जून रोजी फिर्यादी यांना फोन करून धमकी देत आणखी १० हजार ४०० रुपयांची मागणी केली होती.
या धमकीनंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे खान याच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुशंगाने येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




