देहू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी आठ वाजल्यापासून 14 जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ तारखेच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येणार आहे. या पगडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
मोदींना पगडी आणि उपरणे भेट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनच्या देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.