बुलढाणा– राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीसोबत शिवसेनेला मोठा झटका बसला. या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मविआकडे संख्याबळ असताना त्यातील काही अपक्ष आणि घटक पक्षांची मते फुटली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला.
राज्यसभेत भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकून आले. त्यानंतर आता या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ज्या अपक्ष आमदारांची मते मविआच्या उमेदवाराला पडली नाहीत अशांना निधी देणार नाही अशी भूमिका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, अपक्ष आमच्यासोबत होते, राज्यसभा निवडणुकीत दगाफटका झाला. कोण कोण त्यांच्यासोबत गेले याची माहिती मिळतेय. जर आमच्यासोबत राहून निधी उपलब्ध करून घ्यायचा, विकासकामे करून घ्यायची. मग बाकीच्या मार्गाने मते विरोधकांना द्यायची. आम्ही या आमदारांना कसाला निधी देऊ असा सवाल त्यांनी केला आहे.