पुणे : पुण्यातील भवानी पेठेत आज संध्याकाळी स्फोट घडल्याची घटना घडली. या भागात असणाऱ्या विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी राशद शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून तो मूळचा मुंबईचा आहे. मात्र तो याच फ्लॅटमध्ये राहतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेरींगचे कामे करतो.
पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले असून फ्लॅटमधून काही सीमकार्ड आणि पासपोर्ट देखील जप्त केल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचे समजत आहे. संशयित व्यक्तीकडे पोलिस कसून चौकशी करित आहेत. शेख हा गेल्या दहा वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली.




