पिंपरी : पिंपरी चिंचवड-देहू येथील शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाराजी आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण नियोजन भाजप आणि सांप्रदायिक लोकांच्या हातात होते असे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले.
पुणे जिल्ह्यातील हा मोठा कार्यक्रम अराजकीय आणि सर्वसमावेशक करताना गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. मावळ,पिंपरी, चिंचवड,भोसरी,खेड विधानसभेच्या आमदारांना आणि पुणे जिल्ह्यातील खासदारांना या ठिकाणी मंचावर स्थान नव्हते.
पंतप्रधान कार्यालयाने कार्यक्रम पत्रिका ठरवताना कोणाचा सल्ला घेतला होता.हा कार्यक्रम भाजपचा की देहू संस्थानचा यावर चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुणे विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडवले.
मात्र देहू येथील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देता संयोजक आणि पंतप्रधान कार्यालयाने वारकरी संप्रदायाच्या व्यापक विचारसरणीला तिलांजली दिली आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस काशिनाथ जगताप यांनी दिली आहे.ते म्हणाले की,पंतप्रधान मोदी यांचे देहूरोड येथील आगमन हा आनंद सोहोळा होता.त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचे दर्शन संपूर्ण देशाला लाईव्ह पाहायला मिळाले.या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलायची संधी दिली असती तर महाराष्ट्राचा अपमान झाला नसता असे मत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कांग्रेसचे सरचिटणीस काशिनाथ (आण्णा) जगताप यांनी व्यक्त केली आहे.




