पिंपरी : महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी संपर्क कार्यालयांची शहरात ठिकठिकाणी दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला होता. शहरातील चौकाचौकांमध्ये विविध राजकीय कार्यकर्त्यांची संपर्क कार्यालये पावसाळ्याच्या छत्र्यांसारखी उगवल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, 2017 च्या महापालिका निवडणुकीत लाटेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मात्र आता पुरती गोची झाली आहे. कारण ठरले आहे ते महापालिकेतील प्रशासकीय राजवट…
महानगरपालिकेतील नगरसेवक पदाचा कार्यकाल मार्च २०२२ महिन्यात संपल्यानंतर सर्वच विद्यमान माजी नगरसेवक बनले आणि महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. यानंतर प्रशासनाकडून प्रत्येक प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक सोमवारी सभा आयोजित करण्यात आली. यात नागरिकांच्या तक्रार व निवारण यांचा तात्काळ निपटारा होवू लागला. त्यामुळे एरवी नगरसेवकांच्या कार्यालयात तक्रारी घेऊन जाणारे नागरिक त्यांच्या कार्यालयाकडे पाठ फिरवू लागले. मागील तीन महिन्यापासून नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांचा ओढा हळूहळू कमी होऊ लागला. याचा मोठा फटका २०१७ च्या लाटेत पहिल्यांदा निवडून येणाऱ्या नगरसेवकांना सर्वाधिक होताना दिसत आहे.
मागील पाच वर्षात शहरातील खुंटलेला विकास व भकास झालेले शहर पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे. सर्व शहर पूर्वीसारखे स्वच्छ व सुंदर दिसू लागले आहे. प्रशासकीय राजवटीत शहरात बोकाळलेली अनाधिकृत पत्राशेडवरती राजकीय हस्तक्षेप न घेता सर्व पक्षातील नगरसेवकाच्या प्रभागात कारवाई करून आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील मोठमोठे चौकांना मोकळा श्वास घेवून दिला आहे. यामध्ये मोशी, रावेत, वाकड, चिखली, भोसरी या परिसरात अनेक राजकीय वरदहस्त असणाऱ्या लोकांनी चौकाचौकात टपऱ्या, पत्राशेड उभारून आर्थिक तरतूद करून ठेवली होती. त्या सर्व राजकीय नेत्यांच्या मुसक्या आवळण्याची काम आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व त्यांच्या प्रशासनाने केले आहे. याचे सामान्य पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
२०१७ ते २०२२ काळात झाली नाहीत ती सर्व कामे मागील तीन महिन्यात करण्यासाठी प्रशासनाकडून मोठी हालचाली केल्या आहेत. यामध्ये अनेक मुख्य रस्ते सायकल व पादचारी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहेत. रात्री वर्दळ असणाऱ्या रस्त्यांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी प्लेगोथोंन मोहीम राबविण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना “pcmc smart sarathi” च्या माध्यमातून पालिकेच्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील विविध भागात दवाखाने, उद्याने विकसित करण्यात आली आहेत. नव्याने शहरातील छोटे-मोठे चौक शिल्प बसवून सुशोभिकरण करण्यात येत आहेत. व्हाट्सअप चॅट बोर्डच्या माध्यमातून नागरिकांना महापालिकेतील प्रत्येक विभागाची माहिती सर्वांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोविडच्या दुसर्या लाटेत पदभार स्वीकारणाऱ्या आयुक्त राजेश पाटील यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने प्रशासकीय राजवटीत अधिक उठून आली आहे. यामुळे काही वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहराला एक उत्तम आयुक्त मिळाला अशी चर्चा सामान्य पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे.




