पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – प्रेयसीच्या भावाने तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री सव्वानऊ वाजता धनगरबाबा मंदिराजवळ थेरगाव येथे घडली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत रुपसिंग भाट (वय २३, रा. धनगरबाबा मंदिराजवळ, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय ननवरे (वय २५, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा चुलत भाऊ ज्यूड उर्फ आकाश अल्बट जोसेफ, मित्र सुमित साठे असे गप्पा मारत उभे होते. जोसेफच्या प्रेयसीचा भाऊ आरोपी तिथे कोयता घेऊन आला. ‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो. तुला मारूनच टाकतो’ असे बोलून ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, चेह-यावर वार करून गंभीर दुखापत केली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र जोसेफला वाचविण्यासाठी मध्ये गेले असता आरोपीने पालघन त्यांच्यावर उगारून ‘कोणी मध्ये आले तर सोडणार नाही’ अशी धमकी देऊन शिवीगाळ करून दहशत पसरवली आणि आरोपी तिथून पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.




