पिंपरी : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातून भाजपच्या उमा खापरे यांना पहिल्या पसंतीची २७ मते मिळाल्याने विजयी झाल्या. त्याच बरोबर पिंपरी चिंचवड शहराला आता त्यांच्या रूपाने प्रथम महिला आमदार मिळाल्या आहेत. त्यामुळे शहरात भाजपचे आता तीन आमदार झाले आहेत.
याबाबत बोलताना खापरे म्हणाल्या, ”माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाने एका छोट्या कार्यकर्तीला न्याय दिला आहे. हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करते.
राज्यातील मोठ्या महिला नेत्यांना डावलून खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. थेट पंकजा मुंडे यांचे तिकीट कापून खापरे यांना संधी दिल्याचा आरोपही झाला होता.
खापरे या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
कुणाला किती मतदान?
प्रवीण दरेकर (भाजपा)- २९
श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३०
राम शिंदे (भाजपा)- ३०
उमा खापरे (भाजपा)- २७
प्रसाद लाड (भाजपा)- २८
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)- २९
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)- २८
आमश्या पाडवी (शिवसेना)- २६
सचिन अहिर (शिवसेना)- २६
भाई जगताप (काँग्रेस)- २६
चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)- २२ (पराभूत)




