पिंपरी : “ज्ञानोबा माऊली तुकाराम” जयघोष करीत पंढरीला निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आज (मंगळवारी) उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी उद्योग नगरीतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डी दत्तवाडी विठ्ठल मंदिरात असणार आहे.

कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाची पायी वारी मोकळ्या वातावरणात होत आहे त्यामुळे अनेक विठ्ठल भक्तांच्या आनंदाला उधाण आलेले दिसून आले. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवित यंदा पालखी सोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे समस्त वैष्ववजणांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. 20) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. काल पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी होती. आज देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान झाले.
माळवाडी, झेंडेमळा, देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि देहूकरांचा निरोप घेऊन पुणे-मुंबई महामार्गाने पालखी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती शक्ती चौकात पोहोचली. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारक-यांची रांग, टाळ-मृदंगाचा गजर आणि रिमझिम पावसात आनंदाला आलेली भरती असे मनमोहक दृश्य शहरवासीयांना अनुभवयास मिळाले.




