पिंपरी : आज २५ जून रोजी पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणारे पवना धरणात १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिना संपत आला तरीही पावसाने ओढ दिल्याने शहरात काही दिवसात पाणी कपातीचे संकट ओढवू शकते. पवना धरणात पुढील ३६ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास शहरवासीयांवर पाणी कपातीची टांगती तलवार राहणार आहे.
पिंपरी – चिंचवड औद्योगिकनगरीस मावळातील पवना धरणातून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील धरणातून नदीत जलउपसा केंद्रातून प्राधिकरणातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरात उभारण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते. जलवाहिन्याच्या माध्यमातून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो.
शहरात सध्या ५४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. हे पाणी शहरातील अर्ध्या भागात एक दिवस आणि उर्वरित भागात दुसऱ्या दिवशी पुरविले जाते. पाणी उपसा करण्याची यंत्रणा सक्षम नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना धरण परिसरात जून महिन्यात पाऊस पडत असतो. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात धरण शंभर टक्के भरत असते. यावर्षी पावसाने ओढ दिली आहे. जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांची चिंता वाढली आहे. यावर्षी केवळ २४ मिमी पाऊस पडला आहे.




