लोणावळा:- पर्यटननगरी म्हणून संबोधल्या जात असलेल्या लोणावळा, खंडाळ्यासह मावळातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या गर्दीमुळे पर्यटकांना दिवसभर वाहतूक कोंडीत तासंतास ताटकळत रहावे लागले. तसेच लोणावळा खंडाळ्यासह मावळात पावसाने दडी मारल्याने वर्षा विहार व पर्यटनासाठी आलेल्या हजारो पर्यटकांचा हिरमोड देखील झाला. यावर्षी पावसाने एक दोन दिवसांचा अपवाद वगळता अद्याप दडी मारली आहे. यावर्षी आज अखेरपर्यंत केवळ ९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी आज अखेरपर्यंत ९४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तसेच पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशीडॅम देखील मागील वर्षी १९ जूनला ओव्हरफ्लो झाले होते.
शनिवार व रविवार या सलग दोन सुट्ट्यांचे औचित्य साधत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांनी लोणावळा खंडाळा व मावळातील पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळवला होता. मात्र पर्यटकांची ही वाढलेली संख्या आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेली वाहनांची गर्दी, यामुळे खंडाळा घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू होती.
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तर खंडाळा ते लोणावळ्या जवळील वरसोली टोलनाक्या पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याशिवाय पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांसह स्थानिकांना देखील डोकेदुखी सहन करावी लागली. एकीकडे वाहतूक कोंडीचा सामना करत वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा पाऊसच नसल्यामुळे हिरमोड झाला आहे. दिवसभर वाहतूक कोंडी सोडविताना बोरघाट, खंडाळा महामार्ग व लोणावळा शहर पोलिसांची दमछाक झाली होती.




