पिंपरी : जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिपरी चिचवड शहराबाहेर जावे लागते. ही सोय याच शहरात उपलब्ध व्हावी यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. जलतरणपटूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे, याकरिता संस्थांना शहरातील सात जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. पीपीपी तत्त्वावर जलतरण तलाव चालविण्यास दिल्यामुळे महापालिकेची प्रतिवर्षी सुमारे तीन कोटी रुपयांची बचत होणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा उद्योगनगरी म्हणून नावलौकिक आहे. पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
या खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणदेखील दिले जाईल. कासारवाडी जलतरण तलाव, निगडी जलतरण तलाव, पिंपरी वाघेरे जलतरण तलाव, पिंपळे गुरव जलतरण तलाव, यमुनानगर जलतरण तलाव, वडमुखवाडीच होली जलतरण तलाव, नेहरूनगर जलतरण तलाव असे ७ तलाव पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येतील. उर्वरित तलाव महापालिकेच्या वतीने चालविण्यात देणार आहोत अशी माहिती मिळाली आहे.
जलतरणपटूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची संधी आता शहरातच उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या माध्यमातून शहरात जलतरण क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील जलतरणपटूंना अशा प्रशिक्षणाचा लाभ होईल.
– राजेश पाटील (आयुक्त तथा प्रशासक)




