पिंपरी (प्रतिनिधी) जप्तीपूर्व नोटीस देऊनही ज्या मिळकत धारकांनी अद्याप कराचा भरणा केला नाही. अशा मालमत्ताधारकांवर १ जुलैपासुन जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. ही कारवाई शहरातील पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जूनपूर्वी कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.
शहरात ५ लाख ७२ हजार मिळकतींची नोंद आहे. गतवर्षी या विभागाने सव्वा सहाशे कोटी रूपयांचा कर वसूल केला आहे. तर २०२२- २३ या आर्थिक वर्षात या विभागाने एक हजार कोटींचे उदिष्ट ठेवले आहे. शहरातील मिळकत धारकांना पालिकेच्या कर संकलन विभागामार्फत कर आकारणी केली जाते. तसेच मिळकत धारकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. महिलांना सामान्य करामध्ये ५० टक्के, दिव्यांगांना सामान्य करामध्ये ५० टके, माझी सैनिकांना मालमत्ता करात संपूर्ण सवलत, ऑनलाइन पेमेंट केल्यास ५ टक्के सवलत देण्यात येते. ३० जूनपूर्वी कर भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात १० टक्के देण्यात येते. पर्यावरण पूरक इमारतींना व पर्यावरण पूरक निवासी मालमत्तांना १० टक्के, आगाऊ भरणा केल्यास १० टक्के, ऑनलाइन भरण्यासाठी ५ टक्के असे एकूण २५ टक्कांपर्यंत सवलत मिळते.
- चेक बाऊन्स करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार
गतवर्षी ज्या नागरिकांचे धनादेश बाऊंन्स झालेले आहेत. त्यापैकी अनेकांनी कर भरणा केला आहे. मात्र, अनेक मिळकत धारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा नागरिकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा नागरिकांना नोटीस पाठविली आहे. ज्यांनी महापालिकेला उत्तर दिले नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.




