- पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे – कविता आल्हाट
पिंपरी, २ जुलै : आधुनिकीकरण व शहरीकरणामुळे माणूस निसर्गाच्या सानिध्यापासून दूर झाला. प्रचंड प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला घातक अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे असे मत कविता आल्हाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात राबवण्यात येत आहे. पिंपरी ,चिंचवड,भोसरी अशा तीनही विधानसभा मतदार संघामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आल्हाट बोलत होत्या. त्या म्हणाल्या पिंपरी चिंचवड शहराला मोठा हरित वारसा आहे. पवना आणि इंद्रायणी नदीच्या खळखळाटामध्ये वाढलेले हे शहर सध्या मात्र प्रदूषणाच्या विळख्यात आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात होतो तेव्हा आपल्याला आरोग्यदायी वातावरण लाभत होते व पर्यावरण विषयक समस्या नव्हत्या. परंतु आता प्रगतीच्या नावावर आधुनिकीकरण व शहरीकरणामुळे माणूस निसर्गाच्या सानिध्यापासून दूर झाला. विविध क्षेत्रातील प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाने पर्यावरणाला घातक अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. हीच प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकर घेतला आहे . असेच उपक्रम आता प्रत्येक प्रभागात घेतले जाणार आहे असेही आल्हाट यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक महिला ,नागरिक उपस्थित होते.




