पिंपरी दि. ४ जुलै :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाने आंद्रा धरणातून पाणी कोटा मंजुर केला आहे. निघोजे येथे इंद्रायणी नदीतून अशुद पाणी उपसा करून चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुद्ध करण्यात येणार आहे. यासाठी चिखली जलशुध्दीकरण केंद्रासाठी नवीन जलवाहिनी जोडण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे
चिखली जलशुध्दीकरण केंद्र ते देहू-आळंदी बीआरटी रस्ता, सोनवणे वस्त्रीपासून स्पाईन रोड येथे पालिकेच्या जलवाहिनीला ११०० मि. मी. व्यासाची नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पिंगळे रोडवरील राधा स्वामी सत्संग न्यास ते चिखली – आकुर्डी मार्गे रॉयल ग्रेनाईट ते नेवाळे वस्ती कॉर्नर ते गणेश मंदीर नेवाळे मळा ते विनायक रेसिडेन्सी ते व्हिक्टोरिया स्कूल समोरील रस्ता ते साईप्रयाग सोसायटी नं. २ ते घरकुल भाजी मंडई रस्ता ते साईसदन सोसायटी (इमारत क्र. सी- २०) परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम ५ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत टप्याटप्याने होणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.




