मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची आज सांगता झाली. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास ठरले. अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सत्ताधारी तसेच विरोधकांनीही समाधान व्यक्त केले. तर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून मी माझी जबाबदारी चोख पार पाडणार आहे. आजपासून एकही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असे स्पष्टपणे सांगत अजित पवार आगामी काळात विरोधी पक्ष नेत्यांची धार तीव्र करणार असा इशारा शिंदे सरकारला दिला आहे.
विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची गरज नाही. त्याचा उल्लेख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र, सरकारचे धोरण हे जनतेच्या विरोधात जाणार असेल, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.



