तळेगाव दाभाडे (वार्ताहर) मैत्रिणी सोबत पर्यटनासाठी आलेली तरुणी इंद्रायणी नदीपात्रात वाहून गेली. ही घटना बुधवारी (दि.6) दुपारी 3 वा. कुंडमळा इंदोरी ता. मावळ येथे घडली.
साक्षी सतीश वंजारे वय 20 रा. कस्तुरी मार्केट, थर्माक्स चौक, आकुर्डी पुणे असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी पुणे परिसरातुन मैत्रिणी सोबत पर्यटनासाठी इंदोरी येथील कुंड मळा येथे आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना, दुपारी 3 वा. पाय घसरून इंद्रायणी नदीपात्रात वाहून गेली या घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड, पोलीस अंमलदार अशोक आंबेकर, प्रशांत सोरटे, सुरेश भोजने आदींनी धाव घेतली. वन्यजीव रक्षक मावळ, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे पथक दाखल होऊन तरुणीचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली.
सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती. अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवली, वाहून गेलेली तरुणी अद्यापही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी 8:30 वा. शोध मोहीम सुरु करणार आहेत. कुंडमळा या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात सुमारे 8 ते 10 पर्यटकांचा नदीपात्रात वाहून गेल्याने मृत्यू होतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुण पर्यटक येतात. अति उत्साहीपणा जीवावर बेततो. कुंडमळा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.




