देहूगाव ( वार्ताहर ) देहू नगरपंचायत हद्दीत अवेळी येणाऱ्या कचरा घंटागाड्या ,कचरा निर्मूलन, तुंबणाऱ्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्याने साचणारे रस्तावरील पाणी यासारख्या मूलभूत असुविधांमुळे संतप्त महिलांनी बुधवारी ( दि.६ ) नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. मात्र अनुपस्थित पदाधिकाऱ्यांमुळे एक तासांनी महिलांना निराश होवून परतावे लागले.
देहू नगरपंचायत हद्दीत अवेळी व अनियमित येणाऱ्या कचऱ्याच्या घंटागाड्याने नागरिक त्रस्त झाला आहे.अवेळी व अनियमित येणाऱ्या कचरा घंटागाड्यांमुळे नागरिकांना साचलेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला पडणारा कचरा त्वरित उचलला जात नसल्याने पावसाळ्यात सडून दुर्गंधी पसरत आहे.अनेक ठिकाणी नाले ,भूमिगत गटारी मलनि:सारण वाहिन्या तुंबत असल्याने पावसाचे व नाल्याचे दुर्गंधीत पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारी ही वाढल्या आहेत.
ओमकार सोसायटी ,रायगड सोसायटी, पुरंदर सोसायटी, सिंहगड कॉलनी आदी भागामध्ये अवेळी पोहोचणाऱ्या घंटागाड्या ,खड्डेमय बनलेल्या रस्त्यांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने निसरडा बनलेल्या रस्त्यावरून घसरून पडत आहे तर पाण्यातून चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवाबत्ती, आरोग्य ,स्वच्छताकर सह कर भरूनही नगरपंचायतीकडून मिळणाऱ्या असुविधामुळे काही संतप्त महिलांनी बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला होता .मात्र तेथे पदाधिकारी अनुपस्थित असल्याने एक तास वाट पाहील्या नंतर महीलांना निराश होऊन परतावे लागले आहे .यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.




