पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात मंगळवारी व आज बुधवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. मागील तीन-चार दिवसांपासून परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. शहरात अनेक सखल भागात पाणी साचल्याने पिंपरी चिंचवड पहिल्याच पावसात तूंबई झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत तुकारामनगर, यशवंतनगर, ताथवडे, पूनावळे, चिंचवड, चिखली, दापोडी, गुरुद्वारा आदी सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.

काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना आपल्या घरापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी तारेवरतची कसरत करावी लागत होती. अशातच संततधार येत असल्याने पिंपरीतील जनजीवन थोड्याफार प्रमाणात धिम्या गतीने सुरू होते. पिंपरीच्या भाजी मंडईत एरवी खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. परंतु, संततधार पावसाचा परिणाम भाजी मंडईत आणि पिंपरी कॅम्प परिसरात शुकशुकाट दिसत होता.




