पिंपरी : मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. मात्र पवना धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत झालेला पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली असता यंदा 14.83 टक्क्याने पाणीसाठा कमी असल्याची माहिती पुढे आली आहे. धरण क्षेत्रात गतवर्षी 1 जून ते 7 जुलै या कालावधीत 545 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.
तर, 34.28 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 82.63 दशलक्ष घनमीटर इतका होता. गतवर्षी जून महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जास्त होता. त्या तुलनेत यंदा मात्र जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. म्हणजे यंदा पाऊस एक महिना उशिरा आला आहे.
धरणक्षेत्रात 1 जूनपासून आतापर्यंत 392 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, आज दिवसभरात 55 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणामध्ये सध्या 43.87 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. टक्केवारीत हे प्रमाण 19.45 टक्के इतके आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणी पातळीत वाढ होत आहे, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी दिली.



