वडगाव मावळ :– निवडणुक आयोग यांचेकडून मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो प्राप्त करून घेऊन मतदार यादीमध्ये अपलोड करणे तसेच मतदार यादीतील जे मतदार यादीतील पत्यावर राहत नसलेचे आढळून येईल त्याची नावे वगळणे तसेच ज्या मतदाराची एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे आहेत अशा मतदारांचे एक नाव कायम ठेऊन इतर नावे वगळण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
त्यानुसार मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो प्राप्त करून घेणेबाबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. तसेच ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव आहे अशा मतदारांचे एक नाव कायम ठेवून इतर नावे कमी करणेबाबत नोटिस देवून नमूना ७ चा अर्ज सादर करणे तसेच मतदार यादीमध्ये फोटो नसलेले व एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांपैकी जे मतदार मतदार यादीतील पत्यावर राहत नसलेचे आढळून आले आहेत त्यांचे नमूना ७ चे अर्ज भरून देणेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून कार्यवाही सुरू आहे.
तथापि आगामी नगर पालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ आहे की नाही तसेच बरोबर आहे का याबाबत पडताळणी करून घ्यावी तसेच जर एखादया मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी समाविष्ठ असेल तर त्यांनी एक नाव कायम ठेवून इतर ठिकाणची नावे कमी करण्यासाठी नमूना ७ चा अर्ज भरून तहसिल कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा तसेच एखादया मतदारांचे नाव चूकीने वगळण्यात आले असेल तर त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह तहसिल कार्यालय येथे नमुना ६ चा अर्ज जमा करावा असे आवाहन मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी नागरिकांना केले आहे.




