कार्ला : लोणावळ्या जवळील डोंगरगाव (ता. मावळ) येथे निकमवस्ती येथे रेल्वे पटरीच्या बाजूला असणाऱ्या एका पाण्याच्या खड्ड्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ह्या महिलेच्या हातवर, तोंडवर, गळ्यावर धारदार शस्राने वार करुन तीचा खून करण्यात आला असून, पाणी साचलेल्या खड्ड्यात तिचे प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पाटील जयश्री विजय कचरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भा.दं.वि.स.का. ३०२.२०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे. फिर्यादीनुसार घटनास्थळी एका 35 ते 40 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिला रंगाने गोरी असून चेहरा गोल आहे. पाण्यामध्ये पडल्याने चेहरा फुगून विद्रुप झालेला आहे. सदर महिलेच्या डोक्याचे केस लांब व काळे असून तिच्या उजव्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या तीन बांगडया तर पायामध्ये पांढरे धातूचे पैजन असून त्यावर एका बाजूला PAS असे दुसऱ्या बाजूला PSDX असे लिहिलेले असून कडीवर “ज्ञान” असे लिहिलेले आहे. याशिवाय सदर महिलेच्या पायामध्ये पांढऱ्या धातुची पाच जोडवी, करंगळी जवळचे बोटामध्ये पिवळे धातूची अंगठी, अंगावर राखाडी रंग आणि लाल, काळ्या किनारीची साडी असून तीवर पांढरे रंगाची डिझाईन आहे. तसेच लाल रंगाचा ब्लाऊज आणि लाल रंगाचा परकर या महिलेने परिधान केलेला आहे.
सदर महिलेची हत्या करण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा ग्रामीण सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश माने हे करत असून. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला महिला बेपत्ता असल्याची तक्रार असल्यास कळवावे तसेच नातेवाईक ह्यांचा शोध घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आहवान देखील पोलिस स्टेशनच्या वतीनं करण्यात आले आहे.




