पिंपरी दि. १३ जुलै :- विधी समिती, स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. स्थायी समितीची मान्यता आवश्यक असणा-या विविध विषयांच्या सुमारे ३० कोटी रुपये खर्चासदेखील प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विविध विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ मधील विकासनगर, मामुर्डी मधील ताब्यात आलेले रस्ते डांबरीकरण करून विकसित करण्यासाठीच्या १० कोटी ६४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.७ मधील भोसरी गावठाण परिसर, सँडविक कॉलनी, खंडोबा माळ परिसर, तसेच शांतीनगर लांडेवाडी परिसरात मलवाहिनी सुधारणा कामे करण्यासाठी ४३ लाख रुपये खर्च होणार आहे. प्रभाग क्र.१८ मधील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या २० लाख रुपये, प्रभाग क्र.१० मधील कवडेनगर, संत तुकाराम नगर तसेच उर्वरित भागात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या आणि विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन करण्याकरीता करण्यात आलेले चर बुजविण्यासाठीच्या २५ लाख ८३ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या भाटनगर, बौद्धनगर, रमाबाई नगर झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक सुविधा पुरविण्यासाठी १६ लाख ४८ हजार रुपये खर्च होणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागासाठी स्टेनलेस स्टील सिंगल हँगींग एस.एस.३०४ ग्रेड लिटर बीन्स खरेदी करण्यासाठी ७२ लाख ४५ हजार रुपये खर्च होतील. दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून रावेत येथील मुख्य जलवाहिनी ची क्षमता वाढविण्याकरीता कामे करण्यासाठी तसेच नव्याने पाईपलाईन टाकण्यासाठी आणि सर्ज अरेस्टर बसविण्यासाठी ५ कोटी ४८ लाख रुपये खर्च होणार आहे. तळवडे येथील नवीन नदीजल उपसा केंद्राजवळच्या उच्चदाब फिडर वरून तात्पुरती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण कंपनीस ६० लाख ७१ हजार रुपये अनामत रक्कम तसेच पर्यवेक्षण शुल्क अदा करण्यास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.
महापालिकेमार्फत नेमणूक करण्यात आलेल्या तृतीयपंथीय कर्मचा-यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रभाग क्र. ३ मोशी येथे अग्निशमन केंद्र बांधण्याच्या कामातून मोशी येथील आरक्षण क्रमांक १/१७१ येथे तात्पुरत्या स्वरुपात वर्गखोल्या बांधण्यास, प्रभाग क्र. ११ मधील मैला शुद्धीकरण जवळील स्पाईन रोड सर्विस रोडच्या लगत खाऊगल्ली सुरु करण्यास, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात फूड कोर्ट सुरु करण्याच्या धोरणास, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मलनि:स्सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पद्धतीने करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याच्या विषयांना प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली. या विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती.
महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर लाईट हाऊस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य विषयक कामे करण्याच्या विषयाला विधी समितीची मान्यता आवश्यक होती, त्यास देखील प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.




