वडगाव मावळ : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आगामी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने इच्छुक उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषदेचा कार्यकाळ संपून अनेक महीने झाले असून केव्हाही नगरपरिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील इच्छुक नगरसेवकांनी तयारी सुरू केली होती. अनेकांनी स्वतः साठी सोयीस्कर ठरेल अश्या प्रभागांची चाचपणी करून तेथील नागरिकांसाठी विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. मात्र थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या मंत्री मंडळाच्या निर्णयामुळे इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्षपदी इच्छुक यांच्या पुढे नवे आवाहन निर्माण झाले आहे. स्थानिक आमदारांच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष होण्याचा डाव आखलेल्या इच्छुकांचा मार्ग खडतर झाल्याने त्याच्या आशेवर पाणी फिरले आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व लोणावळा या दोन्ही नगरपरिषदा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असून याठिकाणी अनेक धनदांडगे उमेदवार आहेत. अनेक धनिक उमेदवार निवडणुकी रिंगणात उतरतात त्यामुळे निवडणुकी मोठ्या प्रतिष्ठेची बनत असते. यामध्ये जर नगराध्यक्षपद हे नगरसेवकांमधून निवडायचे असल्यास थोड्या थोड्या काळासाठी का होईना दरवाजावर नगराध्यक्ष पदाची पाटी लागली जाते.
मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार नगराध्यक्ष निवडण्यासाठी जनतेचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नगरसेवक निवडणुकीनंतरचा आर्थिक घोडेबाजार संपुष्टात येणार आहे. थेट जनतेतुन नगराध्यक्ष निवडल्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना केवळ उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागते. जनतेतुन निवडून आलेले नगराध्यक्ष कारभारी नगरसेवकांना विचारात न घेता मनमानी कारभार करू शकतात.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयानंतर मावळातील तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण येईल, प्रभागात काम करावे की, संपूर्ण शहरात मोर्चे बांधणी करावी, आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी मिळू शकते का असे अनेक प्रश्न इच्छुक उमेदवारांपुढे निर्माण झाले आहे.




