मुंबई : शिंदे सरकार अस्तित्त्वात येताच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अनेकजण सरकारच्या या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते, आणि आज अखेर एकनाथ शिंदेंनी पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 3 रुपयांनी कमी केल्याचं घोषितही केलं.
काहींना पेट्रोल-डिझेलचे घटवलेले हे दर मोठा दिलासा वाटत आहेत, तर काहींना फक्त खोदा पहाड-निकला चुंहा असं वाटतंय. तर याच निर्णयाबद्दलचे 5 फॅक्ट आपण समजावून घेणार आहोत.
१) मविआने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट 50 टक्के कमी करावा अशी मागणी भाजपची होती, मात्र आता सत्तेत आल्यानंतर सरकारने अवघ्या काही टक्क्यांनी व्हॅट घटवला आहे.
२) फक्त काही टक्के व्हॅट घटवल्यानंतरही राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे, आधीच राज्यावरच कर्ज आणि खर्च पाहता, सरकारला हा भार पेलणंही अवघड होणार आहे. राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा पेट्रोल-डिझेल, मद्य आणि अंमली पदार्थांवर लावणारा कर हाच आहे.
३) सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती आणि औरंगाबादमध्ये पेट्रोलवर 26 टक्के व्हॅट आणि 10.12 पैसे स्थानिक कर आकारला जातो, तर डिझेलवर 24 टक्के व्हॅट अधिक 3 रुपये लीटर स्थानिक कर आकारला जातो. ही शहरं वगळता महाराष्ट्रात पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट अधिक 10.12 पैसे स्थानिक कर तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट अधिक 3 रुपये स्थानिक कर आकारला जातो.
४) पेट्रोल डिझेलवरील व्हॅट घटवल्यामुळे आता तुम्हाला पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे, आज रात्रीपासून हे दर लागू होतील, मुंबईत आधी पेट्रोल 111 रुपये प्रतिलीटर होते, ते आता 106 रुपयांवर येईल तर डिझेल 97 रुपयांवरुन 95 रुपयांवर येणार आहे.
५) तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल जर 50 टक्के व्हॅट घटवला असता तर असा कितीसा फरक पडला असता, तर पेट्रोलचा दर तब्बल 17 ते 18 रुपयांनी तर डिझेलचा दर 12 ते 13 रुपयांनी कमी झाला असता. म्हणजे पेट्रोल थेट शंभरीच्या आत आलं असतं.



