पिंपरी, दि. १५ जुलै :- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, उपेक्षित घटकांचे सक्षमीकरण अशा विविध पातळीवर औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपक्रम, योजना आणि प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगसमूहांनी सहभाग घेऊन पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज चिंचवड येथे ‘सीएसआर मीट २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विविध उद्योग समूहांचे प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांसमवेत आयुक्त राजेश पाटील यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, आयटीआय चे प्राचार्य शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
सामाजिक सकारात्मक बदलांसाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सीएसआर निधीद्वारे महापालिकेला सहकार्य करणा-या उद्योग समूहांचे आणि एनजीओंचे आयुक्त राजेश पाटील यांनी आभार मानले. ते म्हणाले, सीएसआरच्या माध्यमातून निधी मिळविणे हा महापालिकेचा उद्देश नसून शहर विकासात आपला सहभाग वाढविणे हा हेतू आहे. पिंपरी चिंचवड शहर सर्वात वेगाने वाढणा-या शहरांपैकी एक शहर आहे. स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा आणि ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. या शहराची स्वत:ची संस्कृती आहे. शहरातील औद्योगिकीकरण आणि विविध पायाभूत सेवा सुविधांच्या माध्यमातून शहराला राहणीमान निर्देशांकात सर्वात प्रथम स्थानी नेण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सातत्य ही महत्वाची गोष्ट असून ती राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुढील ३ वर्षात शहराला कचरामुक्त शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्वच्छाग्रह ही लोकसहभाग असलेली चळवळ आम्ही सुरु केली आहे. नागरी सहभागामुळे ९० टक्क्यांपेक्षा अधिक कचरा वर्गीकरण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पर्यावरणाला हानिकारक असणा-या प्लॅस्टीक बंदीची मोहिम आम्ही सुरु केली असली तरी त्याला पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले असून शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये अशा शिल्पकृती बसविण्यात आल्या आहे. शिवाय टाकाऊ वस्तूंपासून सुशोभित वस्तूंते उद्यान तयार करण्यात येत आहे. ग्रीन स्कूल आणि झिरो वेस्ट स्कूल उपक्रम राबवून स्वच्छता आणि कचरा मुक्तीचे बीजारोपण शालेय जीवनापासून करण्यासाठी महापालिकेने उपक्रम सुरु केला आहे. झोपडपट्टी भागात सकारात्मक बदल घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिका काम करीत आहे. अशा सर्व जनहितकारक उपक्रमात उद्योग समूहांनी सहभाग घेऊन आपले उत्तरदायित्व निभवावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.
महापालिकेला विविध उपक्रमामध्ये सीएसआर निधी देणा-या उद्योग समूहांचा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी, ऋतुजा चापेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या विविध उपक्रम, योजना आणि प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये ई-क्लासरुम, ई-गव्हर्नन्स, वैद्यकीय सुविधा, नवी दिशा, स्वच्छाग्रह, व्हॉटस्अप चॅटबॉट प्रणाली, ग्रीन मार्शल, उमेद जागर, विविध क्रीडा प्रशिक्षण केंद्र, ग्रीन स्कूल आदी महत्वपूर्ण बाबींचा समावेश होता. सीएसआर फंडातून राबविलेल्या उपक्रमांची माहिती विविध उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात दिली. महापालिकेच्या भविष्यातील विविध उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन दायित्व घेण्याची जबाबदारी देखील उपस्थित काही उद्योग समूहांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक ऋतुजा चापेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेच्या सीएसआर कक्षाचे समन्वयक विजय वावरे यांनी केले.




