देहूगाव ( वार्ताहर ) देहू नगरपंचायत आणि नमामी इंद्रायणी सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नदी पात्रात वाहून आलेले जलपर्णी आणि पानफुटी काढण्याच्या कामास शुक्रवारी ( दि.१५ ) सुरुवात करण्यात आली.
गत दहा दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने मावळा मधून इंद्रायणी नदीपात्रात वाढत असलेल्या जलपर्णी पाण्याबरोबर वाहून येत आहेत. देहू येथे वसंत बंधारा असल्याने नदीपात्रात जलपर्णी व पानफुटी साचली आहे. हे जलपर्णी व पानफुटी बंधारा जवळ तसेच नदी पात्रात स्थिरावत वाढत आहे. वाहत्या पाण्यातही जलपर्णी व पानफुटी सुमारे सहा फूट खोल वाढून नदी पात्रात स्थिर झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा फुगोवटाही मोठ्या प्रमाणात वाढला असून बंधाऱ्यालाही धोका निर्माण झाला आहे.
नदीपात्रात वाढत्या जलपर्णी, पानफुटीने निर्माण होणारा संभाव्य धोका याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष वेधत नगरपंचायत व सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णी व पानफुटी काढण्यात येत आहे. यासाठी सेवा संस्थेचे सोमनाथ मुसूडगे यांच्या नेतृत्वात निवृत्ती मोरे,रामेश्वर राऊत, रवी काचे , रवी परदेशी ,संजय काचे, राजू परदेशी ,नवनाथ कांबळे, नासिर मुजावर यांनी एक होडी, गळ, रस्सी, बांबू अशा साहित्याच्या साह्याने जलपर्णी व पानफटी काढण्यासाठी परिश्रम घेत आहे .
नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य, कचरा, राडारोड़ा टाकू नये .नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावा. .नदीपात्रात वाढणारी जलपर्णी आणि पानफुटी प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढल्यास सर्व ठिकाणी सर्व नद्या प्रदूषण मुक्त होऊन जलचर प्राण्यांना धोका होणार नाही तसेच शुद्ध पाणी मिळेल.
डॉ प्रशांत जाधव.मुख्याधिकारी ,देहू नगरपंचायत




